प्राणी गणनेवेळी निसर्गप्रेमींनी रोमांचक अनुभूती

संग्रहित छायाचित्र

बिबट्याचाही थरार : सांबर, भेकर, रानकोंबडे, उदमांजरही दिसले

पुणे – शहरी भागात अथवा मानवी वस्तीच्या परिसरात बिबट्या आल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र बुद्धपौर्णिमेनिमित्त भीमाशंकर अभयारण्यात करण्यात आलेल्या प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला.

उघडी कळमजाई परिसरात आळंदी येथील निसर्गप्रेमींना बिबट्याचा थरार अनुभवता आला. बिबट्याच्या डरकाळ्या, पालापाचोळ्यांतून जाताना होणारा आवाज, बिबट्या पाणवठ्याच्या ठिकाणी आल्यानंतर बेडकांचा झालेला आवाज, जंगलातील पक्षांचा आवाज अशी रोमांचक अनुभूती निसर्गप्रेमींनी यावेळी घेतली.

बुद्धपौर्णिमेदिवशी वनविभागातर्फे संपूर्ण राज्यात दरवर्षी वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. याच अंतर्गत भीमाशंकर येथेही प्राण्यांची प्रगणना करण्यात आली. यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह 52 हौशी निसर्गप्रेमी सहभागी झाली होते. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, आळंदी, घोडेगाव, शिनोली येथील निसर्गप्रेमी आले होते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात असलेल्या 14 पाणवठ्यांच्या ठिकाणी वनविभागातर्फे लाकूड, पालापाचोळ्यांनी बनविलेल्या मचाणात बसून येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना व सर्वेक्षण करण्यात आले. यात बिबट्यासह सांबर, भेकर, रानकोंबडे, उदमांजर, शेकरू हे वन्यप्राणीदेखील दिसल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले.

याबाबत भीमाशंकर वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल डी. आर. झगडे म्हणाले, “कडक उन्हाळ्यात जंगलात पाणी मोजक्‍याच ठिकाणी शिल्लक असते आणि पौर्णिमेच्या रात्री उजेडामुळे प्राणी दिसणे सोपे जोते. म्हणून बुध्दपौर्णिमेला प्राणी प्रगणना केली जाते. यात सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींना ओळखपत्र देण्यात आली होती. यासोबत सूचना व घ्यावयाच्या दक्षता यांची माहिती देण्यात आली. चंद्राचा प्रकाश प्रखर असल्यामुळे व रात्री खूप उशिरा धुके पडल्यामुळे निसर्गप्रेमींना बराच वेळ पाणवठ्याचे निरीक्षण करता आले.’

विविध 159 पशुपक्ष्यांची नोंद :
प्राणी प्रगणनेत 31 सांबर, 24 भेकर, 1 पिसोरी, 1 साळींदर, 1 काळमांजर, 1 घुबड, 59 काळतोंड वानर, 1 मोर, 6 ससे, 2 रान कोंबडी, 18 उदमांजर, 14 रानडुक्कर, 1 साप असे एकूण 159 वेगवेगळे पशु-पक्षी आढळून आले. अनेकांना चार ते पाच सांबर व भेकर एकत्र दिसून आले. प्राण्यांबरोबरच त्यांची विष्ठा, पायांचे ठसे, लोळण घेण्याची ठिकाणे यांचीही माहिती घेण्यात आल्याची डी. आर. झगडे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)