#IPL2022 #RCBvSRH | हैदराबादचा सलग पाचवा विजय

मुंबई – मार्को जॅन्सन आणि टी. नटराजन यांच्या भेदक गोलंदाजीनंतर अभिषेक शर्माने केलेल्या दमदार खेळीच्या मदतीने हैदराबादने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. बेंगळुरूने दिलेले 69 धावांचे माफक आव्हान हैदराबादने 8 षटकांत 1 बाद 72 धावा करत सहज पूर्ण केले.
हैदराबादच्या अभिषेक शर्माचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याला हर्षल पटेलने अनुज रावतकरवी झेलबाद केले. अभिषेकने बाद होण्यापूर्वी 28 चेंडूत 47 धावा केल्या. केन विल्यमसनने नाबाद 16 तर राहुल त्रिपाठीने नाबाद 7 धावा करत विजय साकारला.
An emphatic win for #SRH as they beat #RCB by 9 wickets 👏🔥
Splendid performance from Kane & Co. This is one happy group right now 😃😃
They move to No.2 on the points table #TATAIPL | #RCBvSRH | #IPL2022 pic.twitter.com/TocgmvruFL
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
तत्पूर्वी हैदराबादच्या भेदक गोलंदाजांपुढे अक्षरशः लोटांगण घातल्याने बेंगळुरूने निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 68 धावांची 15व्या पर्वातील सर्वात निच्चांकी धावसंख्या उभारली. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या सुयश प्रभुदेसाई (15) आणि ग्लेन मॅक्सवेल (12) या दोघांनाच दुहेरी आकडा ओलंडता आला. तर अन्य फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले.
बेंगळुरूची ही वैयक्तिक दुसरी, तर आयपीएल इतिहासातील सहावी निच्चांकी धावसंख्या ठरली. हैदराबादकडून मार्को जॅन्सन आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तसेच जगदीशा सूचितने दोन, तर भुवनेश्वर कुमार व उमरान मलिकने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
अहमदाबादमध्ये अंतिम लढत
आयपीएल-2022च्या फायनलची तारीख अन् ठिकाण अखेर निश्चित करण्यात आले आहे. साखळी फेरीचे सामने मुंबई, पुण्यात खेळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्ले ऑफच्या लढती बाहेर होतील हे आधीच निश्चित होते. यानुसार अंतिम सामना अहमदाबाद येथे दि. 29 मे रोजी खेळवण्यात येईल, तर प्ले ऑफ व एलिमिनेटर दि. 24 व दि. 26 मे रोजी कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. दुसरी प्ले ऑफ दि. 27 मे रोजी अहमदाबाद येथे होईल. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांना संपूर्ण प्रेक्षकक्षमतेची परवानगी दिली गेली आहे.





