पंकज, अरुण, ब्रिजेश यांचे सहज विजय

मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्डस व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
पुणे : बिलियर्डस अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्डस व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्डस मुलांच्या गटात पीएसपीबीच्या पंकज अडवानी, ब्रिजेश दमानी, आलोककुमार, महाराष्ट्राच्या अरुण अगरवाल, राजीव शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्डस गटात गटसाखळी फेरीत 23 वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत ओडिशाच्या आशुतोष पाधीचा 3-0(151(111)-37, 151(62)-52, 152(84,68)-70) असा सहज पराभव केला.
ग गटात 14 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या व जागतिक बिलियर्डस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महाराष्ट्राच्या अरुण अगरवाल याने पॉंडिचेरीच्या राज मोहन पी.चा 3-0(150-41, 150(138)-10, 150(62)-49) असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
अरुण याने आपल्या खेळीत 138 गुणांचा ब्रेक नोंदविला. इ गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी विजेत्या पीएसपीबीच्या ब्रिजेश दमानी याने महाराष्ट्राच्या चंदू कसोदरियाचे आव्हान 3-0(150-07, 150(71)-131, 152(69)-27) असे मोडीत काढले.
के गटात पीएसपीबीच्या आलोककुमार याने महाराष्ट्राच्या महेश जगदाळेला 3-0(150(56)-129, 150-122, 150(50)-12) असे नमविले. तेलंगणाच्या कडियापू विभास याने आंध्र प्रदेशच्या एमएस रेड्डीचा 3-2(119-152, 151-137, 43-152, 150-115, 150-52) असा संघर्षपूर्ण पराभव केला. ओ गटात रेल्वे स्पोर्टस प्रमोशन बोर्डच्या नीरज कुमार याने महाराष्ट्राच्या रिषभ कुमारचे आव्हान 3-0(151(78)-46, 151(125)-08, 150(50)-62) असे संपुष्टात आणत बाद फेरीत धडक मारली.





