मुंबई : महापालिका निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राज्याच्या गृहविभागातून माजी पोलीस महासंचालकांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 2021 मध्ये अर्बन लँड सीलिंग (यूएलसी) घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. राज्याच्या गृह विभागाच्या एका विशेष चौकशी अहवालातून हा आरोप समोर आला. हा अहवाल नुकत्याच निवृत्त झालेल्या माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या निवृत्तीच्या अवघ्या चार दिवस आधी सादर केला होता. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांना 2016 च्या यूएलसी घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पांडे यांचा उद्देश हा दर्शवण्याचा होता की या दोन्ही नेत्यांनी बिल्डरांकडून पैशांची वसुली केली होती. यासाठी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर सतत दबाव आणला गेला. विशेष चौकशी अहवालात या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय पुनामिया यांनी सादर केलेल्या एका ऑडिओ क्लिपचा देखील उल्लेख आहे. या रेकॉर्डिंगमध्ये कथितरित्या एसीपी सरदार पाटील, डीजीपी संजय पांडे आणि डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांच्यात झालेली बातचीत नोंदवण्यात आली आहे, ज्यात फडणवीस यांना गोवण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली होती. अहवालात म्हटले आहे की, जेव्हा संजय पुनामिया आणि सुनील जैन यांना कोपरी पोलिस स्टेशनमध्ये अटक करण्यात आले, तेव्हा ठाण्याचे तत्कालीन डीसीपी (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील यांनी यूएलसी घोटाळ्यासंबंधी त्यांची चौकशी केली. वास्तविक पाहता ते या चौकशीशी थेट जोडलेले नव्हते. राजकीय आरोप-प्रत्यारोप हा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. खासदार संजय राऊत म्हणाले की, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच त्या या पदावर होत्या. त्यांच्या या अहवालात काही तथ्य नसल्याचा दावा राऊतांनी केला. तर मंत्री नितेश राणे यांनी या कटामध्ये जे-जे सहभागी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.