कृष्णा नदी पात्रात सापडली रामलल्लाच्या मूर्तीसारखी दिसणारी प्राचीन विष्णू मूर्ती; पाहा फोटो

कर्नाटक : अयोध्येत 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. रामलल्लाच्या मूर्तीचे रूप सर्वांच्याच मनाला भावणारे होते. यानंतर कर्नाटकात नदीपात्रात शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती सापडली आहे. 1000 वर्षांपूर्वीची असणारी ही मूर्ती रामलल्लाच्या मूर्तीशी साम्य असणारी आहे. मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंग देखील सापडलं आहे. सध्या या मूर्तीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मूर्तीमध्ये विष्णू उभ्या स्थितीत आहेत. त्यांच्या पाठीमागे प्रभावळ असून त्यावर विष्णूचे १० अवतार कोरण्यात आलेले आहेत. ही मूर्ती ११व्या किंवा १२व्या शतकातील असू शकत, असा पुरातत्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सापडलेली मूर्ती एखाद्या मंदिराचा भाग असावी, असेही तज्ज्ञांचे मत आहे. मंदिराच्या तोडफोडीपासून वाचवण्यासाठी ते नदीत फेकली असावी. या मूर्तीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
मूर्तीची वैशिष्टये
भगवान विष्णूच्या या मूर्तीच्याभोवती ‘दशावतार’ कोरलेले आहेत. मूर्ती मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांनी सजवली आहे. भगवान विष्णूच्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुसज्ज आहेत. दोन हात सरळ खाली आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत. त्यापैकी एक ‘कटी हस्त’ आणि दुसरे ‘वरद हस्त’ आहे. सध्या विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे.






