वैद्यकीय सेवेचे असिधाराव्रत स्वीकारलेलं व्यक्तिमत्त्व डॉ. आनंदा कंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनौबत येसाजी कंक घराण्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेले व्यक्तिमत्त्व डॉ. आनंदा कंक हे गेली 19 वर्षे भोर शहर आणि तालुक्यातील निगुडघर येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. भोरच्या ग्रामीण आणि अतिदुर्गम डोंगरी परिसरात समाजसेवेचे व्रत अंगीकारून त्यांनी या भागांत व्यसनमुक्तीपासून रक्तदानापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत.
भोर तालुका नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असला तरी येथील दुर्गम-अतिदुर्गम डोंगरी भागातील नागरिकांच्या समस्यांसाठी, त्यांना त्वरित पुरेशी आरोग्यसेवा मिळावी यासाठी समाजसेवेचे व्रत स्वीकारून त्यांची काळजी घेणाऱ्या डॉ. आनंदा कंक यांचे अधिष्ठान समाज मनावर ठसलेले आहे. डॉ. कंक हे मूळचे हिरडस मावळ खोऱ्यातील देवघर गावचे; वेणूपुरी येथे त्यांचे बालपण गेले, तर शिक्षण भोर आणि पुणे येथे झाले.
समाजसेवक डॉ. बाबा आमटे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या कर्तृत्वाचा पगडा त्यांच्या मनावर सुरुवातीपासूनच होता आणि तो आजही त्यांच्या कार्यातून दिसत आहे. डॉक्टर पदवी घेतल्यानंतर भोर आणि निगुडघर येथे वैद्यकीय सेवेचे कार्य सुरू केले. 1997 मध्ये मेळघाट येथे स्वयंसेवक म्हणून “मेळघाट मित्र संस्थे’कडून कुपोषण, आरोग्य समस्येवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.
भोर तालुक्यातील हजारो रुग्णांवर त्यांनी आरोग्य शिबिरांमधून मोफत उपचार केले आहेत. रक्तदान, मधुमेह, ईसीजी, रक्तदाब, रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी आदी आरोग्य शिबिरे घेतली. भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोषण आहार, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
करोनाच्या संकटकाळात आणि मुख्यतः लॉकडाऊनच्या काळात या परिसरातील नागरिकांसाठी अन्नधान्य पुरवठ्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, शैक्षणिक साहित्याचे वाटप, थंडीपासून संरक्षणासाठी जॅकेट वाटप, तसेच पोलिसांची आरोग्य तपासणी आदी उपक्रम त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबरोबरच कोविड सटरमध्ये काम करून रुग्णोपयोगी साहित्य देऊन गरजूंना मदत केली आहे.
उत्कृष्ट आरोग्य, पोषक आहार आणि व्यसनमुक्ती ही सुदृढ जीवनाची गुरूकिल्ली आहे आणि या त्रिसूत्रीवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळेच भोर तालुक्यातच नाही तर इतरही ठिकाणी त्यांनी अनेक व्याख्याने देऊन नागरिकांमध्ये प्रबोधनाचे काम केले आहे. याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही त्यांचे कार्य सुरू आहे. प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून ते याबाबत समाजप्रबोधन करीत आहेत. भोर परिसरात योगशिक्षक म्हणून काम करीत असताना योगप्रचार, सामूहिक सूर्यनमस्कार अशा कार्यक्रमातून त्यांनी केलेली आरोग्य जागृती या भागातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
कष्टकरी महिलांचा कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचा आदर करण्यात डॉ. कंक यांचे कार्य महिलांप्रती आदर दर्शविणारे आहे, तर तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना युवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याचबरोबर युवकांसाठी उद्योजक, व्यावसायिक मार्गदर्शन आदी कार्यक्रमही राबवण्यात येत आहेत. दहावी- बारावी, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी डॉ. कंक नेहमीच तत्पर असतात. भोर तालुक्यात डॉ. आनंदा कंक यांनी ग्रामीण भागांत आरोग्यसेवा पुरवत असताना या ठिकाणच्या मूलभूत समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आजपर्यंत के लले े काम ही त्याचं या कायार्च ी खरी ओळख ठरली आहे.
“गाव तिथे ग्रंथालय’- 14 गावांतील योजना
डॉ. कंक यांनी वाचन संस्कृतीचा वसा जपला असून, कृष्णाई जनसेवा संस्था आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून “गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेतून भोर बसस्थानकासह 14 गावांमध्ये त्यांनी वाचनालय सुरू केले असून, हा उपक्रम तालुक्यातील अधिकाधिक गावांत राबवण्यात येणार आहे.
शब्दांकन
विलास मादगुडे,
हिरडस मावळ, ता.भोर


