उद्यापासून अमूल दुधाच्या दरात वाढ

नवी दिल्ली – अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार (दि.1 मार्च) पासून लागू होणार आहे.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन ने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ सोना, ताझा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या अंतरानंतर दरात वाढ करण्यात येत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जीसीएमएमएफ च्या म्हणण्यानुसार, अमूलने गेल्या 2 वर्षांत त्यांच्या ताज्या दुधाच्या श्रेणीतील दरात केवळ 4% वाढ केली आहे. पॅकेजिंग, लॉजिस्टिक, पशुखाद्याचा खर्च वाढल्यामुळे ही किंमत वाढली आहे, त्यामुळे दूध हाताळणी आणि उत्पादनाचा एकूण खर्च वाढला आहे. दर वाढल्याने पशुपालकांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.





