अमृतपालच्या साथीदारांना न्यायालयाचा झटका ! आठ महिन्यांनंतरही जामीन देण्यास नकार

नवी दिल्ली – वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग याच्या साथीदारांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. शिवकुमार आणि भूपिंदर सिंग यांनी जामीनासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ते आठ महिन्यांपासून तुरूंगात आहेत. मात्र आरोपींवर अत्यंत गंभीर आरोप असल्यामुळे त्यांच्या जामीन याचिकेवर विचार केला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने कठोर शब्दांत म्हटले आहे.
ज्या घटनेबद्दल आमच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे ती घटना घडली त्या दिवशी आम्ही अजनालामध्येच नव्हतो असे अजयपाल सिंग उर्फ शिवकुमार आणि भूपिंदर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. पंजाब पोलिसांकडे असलेल्या कोणत्याही व्हिडिओत अथवा छायाचित्रात हे दोघे दिसत नाहीत असे त्यांच्या वकिलाने युक्तीवाद करताना म्हटले आहे.
केवळ अन्य आरोपीने त्यांचे नाव घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी संबंधित घटना घडली आणि २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.५० ला त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली गेली असल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले.
पोलीस १८ मार्च रोजी अजनाला प्रकरणात अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी गेले असता अमृतपाल फरार झाला होता. वेषांतर करून तो लपत होता आणि त्याने आपली ठिकाणेही बदलली होती. त्याच्या अटकेसाठी पंजाबसोबतच हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही काढण्यात आले होते आणि अखेर ३६ दिवसांनी मोगा येथील एका गुरूद्वारात त्याला अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून अमृतपाल आणि त्याच्या काही साथीदारांना आसामच्या दिब्रुगढ येथील एका तुरूंगात ठेवण्यात आले आहे.





