अखेर अमृतांजन पूल ‘जमीनदोस्त’

पर्यटननगरी लोणावळ्यातील ब्रिटिशकालीन पूल इतिहास जमा
लोणावळा – 189 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल काल रविवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास जमीनदोस्त झाला. पुढील तीन ते चार दिवसांत या पुलाचा द्रुतगती मार्गावर पडलेला सर्व राडारोडा उचलला जाणार आहे. त्यानंतर द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
काल रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून अमृतांजन पुलाच्या चार दगडी पिलरमध्ये स्फोटके भरण्यासाठी ड्रीलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक पिलरला पाच फूट उंचीपर्यंत 40 ते 45 होल पाडण्यात आले. हे होल प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर पाडले गेले. त्यानंतर प्रत्येक होलमध्ये जिलेटीन स्फोटके भरण्यात आली. एकूण 300 किलो स्फोटके या कामासाठी वापरण्यात आली. द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंकवरील बोगद्याचे काम करणाऱ्या नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. अमृतांजन पुलाला एकूण 11 कमानी असून, त्यातील मुख्य चार कमानी स्फोटकांच्या साहाय्याने पडण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता आर. पी. सोनवणे, ठाणे महामार्ग पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आदींच्या उपस्थितीत अमृतांजन पूल जमीनदोस्त करण्यात आला. पूल जमीनदोस्त केल्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आजवर याठिकाणी सातत्याने होणारे अपघातात आणि वाहतूक कोंडीच्या प्रमाणात निश्चितपणे घट होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.





