जन्मानंतर 16 वर्षांनी पहिल्यांदाच मुलीने पाहिला पित्याचा चेहरा; शहिद पित्याला बघून मुलगी स्तब्ध

गाझियाबाद – सियाचीनहून परतत असताना उत्तराखंडच्या हरशील येथील दरीत 4 जवान कोसळले होते. यामध्ये गाझियाबादचे जवान अमरीश त्यागी हे शहिद झाले होते. या जवानाच्या मृत्यूने गाझियाबाद हळहळले असून जवान अमरीश त्यागी यांच्या 16 वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याचा चेहरा पाहिला तो या असवस्थेतच. अमरीश त्यागी यांची मुलगी आपल्या पित्याचा मृतदेह तब्बल १६ वर्षानंतर पाहताना केवळ स्तब्ध राहिली. पित्याच्या मृत्यू झाला तेव्हा ती आईच्या गर्भात होती.
शहिद अमरीश त्यागी यांची पत्नीही आपल्या हिमालयाच्या बर्फात बेपत्ता झालेल्या पतीचा चेहरा पाहण्याची आस लावून बसली होती. तब्बल १६ वर्षानंतर या पत्नीला आपल्या शहीद पतीचा मृतदेह पाहायला मिळाला. अमरीश जिवंत असेल. त्यामुळे त्याचे श्राद्ध घातले नाही. नातेवाईक सांगत असायचे की, अमरीश आता जिवंत नाही. मात्र, कुटुंबाचा त्यावर विश्वास नव्हता. एक ना एक दिवस तो परत येईल अशा आशेवर सारे जगत होते.
हिसाली गावातील अमरीश त्यागी सेनेत ऑर्डिनन्स कोअरमध्ये नायक पदावर तैनात होते. 16 वर्षांपूर्वी आग्र्याहून हिमालयाच्या संतोपत टेकडीवर तिरंगा फडकावण्याच्या मोहिमेत ते सहभागी झाले होते. 24 ऑक्टोबर 2005 रोजी टेकडीवर तिरंगा फडकावून खाली परतत असताना त्यांच्या टीमला अचानक बर्फाच्या वादळाला सामोरं जावं लागलं.
या वादळात अमरीश त्यागी यांच्यासहीत आणखीन तीन जवान बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर सुरक्षादलाला तीन मृतदेह हाती लागले होते. मात्र, यावेळी सेनेच्या अनेक प्रयत्नानंतरही त्यांना अमरीश यांचा मृतदेह आढळला नव्हता.
23 सप्टेंबर रोजी सैन्याचं एक पर्वतारोही दल याच मार्गानं जात असताना त्यांना एके ठिकाणी बर्फात सैन्याच्या वर्दीतील एक मृतदेह आढळला. त्यानंतर हा मृतदेह 2005 साली बेपत्ता झालेल्या त्यागी असल्याचे समोर आले आहे.
बिहार रेजिमेंटचे काही जवान शहीद अमरीश त्यागी यांचा मृतदेह घेऊन उत्तर प्रदेशातील हिसाली गावात पोहचले. सैन्य सन्मानासोबत शासकीय इतमामात शहीद अमरीश त्यागी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले.





