अमरावती : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता यादरम्यान काँग्रेस नेत्या व माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाल्या यशोमती ठाकूर? यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रवी राणा व नवनीत राणा दोघेही ब्लॅकमेलर आहेत. लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी केलेलं विधान गंमतीने केलं नसून ते रोज जे करतात तेच त्यांच्या जिभेवर आले आहे. त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा आहे, ते सिद्ध झालं आहे. महिलांसाठी योजना आणायच्या, मतांसाठी त्या वापरायच्या आणि निवडणूक झाली की, ते स्वत:च म्हणतात की, परत घेणार. याचा अर्थ आहे की, एकदा का निवडणूक झाली की, ही योजना बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील, हे सिद्ध झालं आहे. काय म्हणाले रवी राणा ? आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं रवी राणा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तवव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.