अमरावती | टाकरखेडा शंभू(आष्टी) उपकेंद्रामुळे परिसरातील २२ गावांना फायदा – पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती : ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी सुधारित वितरण क्षेत्रीय पद्धतीत (आरडीएसएस योजनेत) ३३/११ केव्हीचे २२ उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. ऊर्जा मंत्री डॉ.राऊत म्हणाले की, पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने उपकेंद्राचे काम गतीने झाले. पालकमंत्र्यांनी मागणी केलेल्या वाठोडा शुक्लेश्वर उपकेंद्राचाही २२ प्रस्तावित केंद्रांमध्ये समावेश आहे.
उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत (HVDS) ६ कोटी ३८ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी उदघाटक म्हणून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आभासी पद्धतीने उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा टाकरखेडा येथे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात अखंडित व उत्तम दर्जाची वीजसेवा मिळण्यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री यांचेकडून प्रयत्न होत आहेत. टाकरखेडा शंभू (आष्टी) व परिसरातील २२ गावांना या उपकेंद्राचा फायदा होणार आहे. या उपकेंद्रावरून सद्य:स्थितीत १ हजार ७०० कृषी व १२ हजार इतर वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय भविष्यात ग्राहकांची संख्यावाढ लक्षात घेता मागेल त्याला वीज पुरवठा करण्यास मदत मिळणार आहे. वीज वाहिनीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावातच हे उपकेंद्र उभारण्यात आल्याने ३३ केव्ही वलगाव व ३३ केव्ही आसेगाव उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे. पर्यायाने त्याचा फायदा वलगाव व आसेगाव उपकेंद्र परिसरातील ग्राहकांनाही योग्य दाबाची वीज उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.
या उपकेंद्रातून एक कृषी व एक गावठान वाहिनी काढण्यात आली असून या अगोदर असलेल्या कृषी वाहिनीची ५५ किमीची लांबी आता फक्त १८ किमीच झाली आहे.शिवाय या वाहिनीवरील ग्राहकाची संख्याही कमी झाली आहे.तसेच गावठान वाहिनीचीही लांबी ३५ किमीवरून १५ किमीच झाल्याने अखंडित व योग्य दर्जाची वीज देण्यास महावितरणला मदत होणार आहे. अमरावती जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अधिक निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
अनिरुद्ध आलेगावकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी आणि आभारप्रदर्शन अभियंता चौधरी यांनी केले.





