Amol Mitakari : शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यावर बंदी घालावी: अमोल मिटकरींची सरकारकडे मागणी, सर्वपक्षीय नेत्यांनी दर्शविला पाठिंबा

मुंबईः कालपासून म्हणजेच ३ मार्चपासून राज्य विधीमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आमदार अबु आझमी यांनी औरंजेबाचे कौतुक करणारे विधान माध्यमांशी बोलताना केले. त्यांनी केलेल्या विधानाने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. औरंगजेबाने मंदिरे बांधल्याचे देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांना आव्हान देत औरंगजेबाने कोणती मंदिर बांधली याची यादी द्या, असे म्हटले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यावर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्यांनी संभाजीमहाराजांची बदनामीकारक नाटकं, चित्रपट आणि कादंबऱ्या कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी केली आहे.
‘या’ आहेत मागण्या
बेबंदशाही, राजसंन्यास आणि रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांवर बंदी घालण्यात यावी.
मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करण्यात यावे.
पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करण्यात यावा.
तिथीचा वाद मिटवण्यासाठी शासनाने एक अभ्यास मंडळाची स्थापना करावी.
आमदार अमोल मिटकरी यांनी वरील मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देखील दर्शवला आहे. यावर आता शासन काय भूमिका घेत ते पाहणे महत्वाचे असणार आहे.





