स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा; म्हणाले “माझ्यावर दबाव होता…”

Amol Kolhe | अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका उत्तमरित्या साकारली. त्याच्या या भूमिकेचे जगभरातून कौतुक केले जात आहे. एकीकडे ‘छावा’ चित्रपट सुपरहिट ठरत असताना डॉ. अमोल कोल्हेंची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला हे दाखवण्यात आलं नाही. त्यावर अनेक चर्चा सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ शेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे.
“स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का?”, “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कोणाचा दबाव होता का?” या चर्चेतील प्रश्नांना उत्तर देताना अमोल कोल्हेंनी खुलासा केला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. Amol Kolhe |
“एखादी मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं,” असे ते म्हणाले. Amol Kolhe |
४० दिवस झालेले अत्याचार रोज टेलिव्हिजनवर दाखवले असते तर…
“छत्रपती संभाजी महाराजांवरचे अत्याचार हे प्रतिकात्मक पद्धतीने, वर्णनात्मक दाखवले गेले. तापलेल्या सळ्या, जमिनीवर पडलेले रक्ताचे थेंब असं तुम्हाला मालिकेत दिसलं. जेव्हा मालिका घराघरात पाहिली जाते तेव्हा शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांनी एकदा आपल्या आईला-बहिणीला प्रश्न विचारा की, जर शंभूराजांवर ४० दिवस झालेले अत्याचार रोज टेलिव्हिजनवर दाखवले असते तर तुम्हाला आवडलं असतं का? तुम्हाला ते पाहवलं असतं का? त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या विकृत मानसिकतेविषयी संताप आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला खरोखर काय पाहायचं होतं? छत्रपती संभाजी महाराजांवर त्या औरंग्याने कसे क्रूर अत्याचार केले हे तुम्हाला पाहायचं होतं? त्यातून तुम्हाला आनंद मिळणार होता का?” असा सवालही त्यांनी केला.
“मालिकेमध्ये शेवट का दाखवला नाही असा कोणाला आक्षेप असेल त्यांना माझी विनंती आहे की शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहायला या. हे महानाट्य पाहिल्यावर तुम्ही कधीच छत्रपती संभाजी महाराजांच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणार नाही. एक कलाकार म्हणून, एक शंभूभक्त म्हणून माझी कलाकार म्हणून एक भूमिका राहिली आहे.”
…कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नाही
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपन केलं तेव्हा पाहिली, त्यामुळं 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जात आहे, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणालातरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट दाखवला नाही असा खोटा प्रचार करणं हा धादांत खोटा प्रचार असल्याचंही यावेळी कोल्हेंनी म्हटलं आहे.
“ही मानसिकता, भावना असेल तर यानंतरही हेतूवर प्रश्न कोणी उपस्थित करत असतील तर मला त्यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते. आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का, असा प्रश्न मी आमच्या हेतूंवर शंका घेणाऱ्यांना विचारतो. मला अशा ट्रोलर्सची कीव येते,” असेही अमोल कोल्हेंनी सांगितले.
हेही वाचा:





