Amol Kolhe : इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित न राहण्यामागे काय कारण? अमोल कोल्हेंनी केलं स्पष्ट
Amol Kolhe : सुप्रिया सुळे व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला उपस्थित राहणार होत्या, पण...

Amol Kolhe : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकामुळे ५० टक्के जागा वाढणार आहेत. लोकसभेची सदस्यसंख्या ५५० वरून ८५० पर्यंत नेण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असून काही विरोधी पक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाकडून डिलिमिटेशनला पाठिंबा दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार यांच्यावर खोचक टीका सुरू केली आहे. पवारांचा खंजीर खुपसण्याचा इतिहास राहिला ते पवारांना आम्हीच राज्यसभेत पाठवल्यापर्यंतची जहरी टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित नाही
दुसरीकडे, आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार होत्या. मात्र त्यांनी ऐनवेळी नकार कळवल्याने पक्षाने सत्तेला अनुकूल निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडाची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहिलेला नाही. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या टीका केली.
यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “अद्याप राष्ट्रवादीने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. सोमवारी आमचे 8 खासदार एकत्र बसून चर्चा करणार आहेत. खासदारांची मते विचारात घेतली जाणार आहेत. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. पण निर्णय झालेला नसताना विधानं येतात दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचं दिसून येतं.”
कालच डीलिमिटेशन बिलाचा ड्राफ्ट आला. दीड दोन दिवसात आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर सोमवारी आमचे खासदार बसून चर्चा करू. विधेयक संसदेत चर्चेला आल्यावर आम्ही त्यात भाग घेणार की नाही हे कळेलच ना?, असेही कोल्हे म्हणाले.
तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित राहणार होत्या. त्यांचं आणि जयराम रमेश यांचं बोलणं झालं होतं. पण काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी विधाने सुरू झाल्याने आम्हीच सुप्रिया सुळेंना बैठकीला उपस्थित राहू नका म्हणून सांगितलं, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी, “राष्ट्रवादीला कसलाही विचार नाही. त्यांना कोणतीही विचारधारा नाही. यांचा जन्मच सत्तेसाठी झाला आहे. बापलेक एकत्र खोलीत बसून निर्णय घेतात. सुप्रिया सुळे यांना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. शेवटी पवारांची ओळख ही पाठीत खंजीर खुपसणारा अशीच राहिली आहे,” असा हल्लाबोल केला होता.
हेही वाचा:





