Amol Kolhe : बोगस मतदार रोखण्यासाठी शरद पवार गट आक्रमक ; मतदार यादीवर लक्ष ठेवण्याचे अमोल कोल्हेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी, कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आताच कामाला लागावे, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.शिक्रापूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, घोडगंगाचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अडचणीच्या काळात पक्षाच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष निश्चित विचार करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ. पवन सोनवणे यांनी अनेक ठिकाणी बोगस मतदान लावले जात असल्याने प्रत्येक बूथ निहाय बूथ कमिटी नेमण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी इच्छुक उमेदवारांना मतदार यादीवर लक्ष देण्याचे आवाहन केले.
बोगस मतदारांचा मुद्दा संसदेत मांडा..
सध्या पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस मतदार उभे केल्याचे चित्र असून, काही ठिकाणी एकाच घरात १८० मतदार असल्याचे समोर आले आहे. आपण याबाबत संसदेत आवाज उठवावा आणि शिरूर-हवेलीत जिल्हा परिषद गटानुसार वेळ द्यावा, अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली.





