अमोल कीर्तिकर ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे ; निर्णयक 48 मतांसाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

Amol Kirtikar । लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. यावेळी निवडणूक निकालावेळी काही ठिकाणचे निकाल शेवट्पर्यंत चुरशीचे झाले. त्यात राज्यातील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेष आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाल्याचे समोर आले. आता याच निकालाच्या विरोधात अमोल कीर्तिकर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत.
अमोल कीर्तिकरांची निवडणूक आयोगात धाव Amol Kirtikar ।
अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक निकालाविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतलीय. अमोल कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाविरोधात राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात दिलेल्या निर्णयाविरोधात अमोल कीर्तिकर लवकरच न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.
लवकरच न्यायालयातही जाणार Amol Kirtikar ।
दरम्यान, अमोल कीर्तिकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएममध्ये छेडछाड केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यासोबतच मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिटच्या स्टोरेजसाठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचं पालन केलं गेलं नसल्याचा दावा पत्रामध्ये कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4 जून रोजी जो निकाल दिला, त्या निकाला विरोधात आता अमोल कीर्तिकर लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं कीर्तिकरांनी पत्रात नमूद केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचा शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी पराभव केला होता. रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या फेर मतमोजणीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता.





