Amit Thackeray : ‘त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही’ अमित ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

मुंबई : मनसे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभव झाला. या मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी ही नक्कीच सोप्पी नव्हती. या ठिकाणी उबाठा पक्षाकडून महेश सावंत, शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर तर मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात होते. या निवडणुकीत महेश सावंत यांनी विजय मिळवला होता.
हा पराभव राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्याही जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीनंतर दोघांनीदेखील ट्विट करून आपले मत व्यक्त केले होते. यानंतर आता अमित ठाकरे आपल्या मतदारसंघात चांगलेच ॲक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराने काल मुंबई हादरली. त्याच प्रकणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी अमित ठाकरेंनी पोस्ट करून नवीन सरकारला इशारा दिला आहे.
काय लिहिले पोस्टमध्ये?
सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.
मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात पाच टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.
मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे. सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे.
जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची!
आपला,
अमित ठाकरे





