अमित ठाकरे आले अन् वाऱ्यासारखे गेले

कोल्हार – गेल्या अनेक दिवसांपासून मनवि सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नगर जिल्हा दौरा करणार असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या एका भेटीसाठी कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. मात्र, अमित ठाकरे नगरहून शिर्डीच्या दिशेने जाताना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे थांबलेच नाही. वाऱ्याच्या वेगाने आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद न साधताच गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आणि हिरमुसले चेहरे पाहायला मिळाल.
अमित ठाकरे हे दि.22 रोजी नगरमध्ये आले. यानंतर ते नगरहून शिर्डीच्या दिशेने जाणार असल्याने या मार्गात येणारे राहुरी, राहुरी कारखाना, चिंचोली आदी ठिकाणचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकले होते. त्यानुसार संध्याकाळी 7 वाजता अमित ठाकरे राहुरीहून शिर्डीकडे जात असताना कोल्हार खुर्द येथे मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांच्यासाठी हारगुच्छ घेऊन रस्त्यावर थांबले होते.
राहुरीहून निघलेल्या अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी कोल्हार खुर्द मध्ये संवाद साधण्याचे टाळले. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांचा सत्कार घेणे देखील पसंत केले नाही. राहुरीहून निघालेला त्यांचा ताफा सरळ शिर्डीच्या दिशेने रवाना झाला. त्यामुळे रस्त्यावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर दिसला, आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले होते.





