Amit Shah : “३१ मार्चपर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार,” अमित शहांचा मुंडलीतून नक्षलवाद्यांना थेट इशारा
Amit Shah :

Amit Shah : सुरक्षा दल आंध्र प्रदेशातील तिरुपती ते नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरापर्यंत तथाकथित रेड कॉरिडॉर तयार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या योजना उधळून लावतील. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत देश नक्षलवादमुक्त होईल, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले.
ओडिशातील कटक जिल्ह्यातील मुंडली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहा म्हणाले की, आंध्र प्रदेशातील तिरुपती ते नेपाळमधील पशुपतिनाथपर्यंत रेड कॉरिडॉर तयार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सुरक्षा दल पराभूत करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवादाच्या विरोधात प्रभावी कारवाई केली आहे आणि देश आता रेड टेरर संपवण्याच्या जवळ आहे.
सीआयएसएफच्या भूमिकेचे कौतुक करताना शहा म्हणाले की, देशातील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांचे रक्षण करून हे दल आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते. सुरक्षा दलांनी देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.





