पुणे : “परभणीत पवित्र संविधानाची विटंबना, त्यानंतर जनतेवर अत्याचार, सोमनाथ सूर्यवंशी यांची लाठीमार करून करण्यात आलेली हत्या, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, भाजपचे नेते अमित शहा यांनी संसदेत केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान या सर्व बाबी संतापजनक आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने येथे केला. या सर्व प्रकरणांचा निषेध करत पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाचे फलक दाखवून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यांच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या गुंडांनी एका सरपंचाची निर्घृण हत्या केली आणि सरकार मात्र गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, हे दुर्दैवी आहे. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान संतापजनक आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा दोघांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी भूमिका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली. या आंदोलनात माजी आमदार जयदेव गायकवाड, किशोर कांबळे, स्वाती पोकळे, शेखर धावडे, नरेश पगडालू, फाईम शेख, श्रद्धा जाधव, दीपक कामठे, अजिंक्य पालकर आदी उपस्थित होते.