Amit Shah : नव्या मल्टी एजन्सी सेंटरचे अमित शहांकडून उद्घाटन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे तसेच गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अचूक माहितीचे आणि तिन्ही सैन्यांच्या अचुक प्रहार क्षमतेचे प्रतीक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. माओवाद्यां विरुद्धच्या ऐतिहासिक कारवाईदरम्यान सुरक्षा दलांमधील समन्वयाचेही त्यांनी कौतुकही केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले मल्टी एजन्सी सेंटर (मॅक) एका नवीन स्वरूपात उदयास आले आहे. अमित शहा यांनी ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन मॅकचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगने सुसज्ज असलेले मॅकचे नवीन नेटवर्क दहशतवाद, अतिरेकीपणा, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ल्यांसारख्या गंभीर धोक्यांना तोंड देण्यासाठी देशाच्या प्रयत्नांना बळकटी देईल असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की नवीन मॅक जटिल आणि परस्पर जोडलेल्या सध्याच्या राष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व एजन्सींच्या प्रयत्नांना एक अखंड आणि एकात्मिक व्यासपीठ प्रदान करेल आणि त्यांच्यात समन्वय देखील स्थापित करेल. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याची क्षमता त्यात आहे.
विविध एजन्सींकडे स्वतंत्रपणे असलेल्या माहितीचा डेटाबेस या प्लॅटफॉर्मशी जोडावा लागेल. यामुळे उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करून समस्यांना तोंड देण्यासाठी रणनीती बनविण्यास मदत होईल. मॅक नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या डेटा विश्लेषणाची गुणवत्ता खूपच चांगली होईल आणि त्यामुळे समस्येचा पॅटर्न आणि ट्रेंड समजून घेण्यास मदत होईल. अचूक माहितीच्या आधारे, समस्येच्या हॉटस्पॉटचे मॅपिंग आणि त्याची टाइमलाइन विश्लेषण करता येईल. यामुळे समस्येचा अंदाज घेण्यास तसेच ती हाताळण्यास मदत होईल असे शहा म्हणाले.
त्यांनी सांगितले की, नवीन नेटवर्क संघटित गुन्हेगारीशी संबंधित दहशतवादी परिसंस्था नष्ट करण्यात दूरगामी परिणाम करणारे सिद्ध होईल. कारगिल घुसखोरीनंतर २००१ मध्ये विविध एजन्सींमध्ये समन्वय साधण्यासाठी मॅकची स्थापना इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत करण्यात आली होती. नवीन स्वरूपात मॅकचे नेटवर्क देशभर पसरलेले आहे, ज्यामध्ये बेटे ते बंडखोरी प्रभावित क्षेत्रे आणि उंच पर्वतीय क्षेत्रे समाविष्ट आहेत. या नेटवर्कवरील कनेक्टिव्हिटी दुर्गम जिल्ह्यांमध्ये बसलेल्या पोलिस अधीक्षकांना (एसपी) सुरक्षित नेटवर्कद्वारे प्रदान करण्यात आली आहे.





