अमेरिकेचा वाढता दबाव; पनामाने चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मधून घेतली माघार

पनामा सिटी, (पनामा) – अमेरिकेच्या दबावामुळे पनामाने चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेतली आहे. पनामाचे अध्यक्ष जोस मुलिनो यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. पनामा कालव्याच्या वाहतुकीमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याच्या मुद्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामाला पनामा कालवा पुन्हा ताब्यात अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिली होती.
त्यामुळे पनामाने चीनच्या बीआरआय प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात पनामाने चीनला यापुर्वीच ९० दिवसांची नोटीसदेखील दिली असल्याचे मुलिनो यांनी पत्रका परिषदेत सांगितले.
चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांत सहभागी होण्याच्या कराराला मुदतवाढ न देण्याचा पनामाचा निर्णय या नोटीसीद्वारे चीनला कळवण्यात आला आहे. आशिया, आप्रिका आणि युरोपाला रेल्वे, रस्ते आणि सागरी मार्गांनी जोडणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी चीनकडून बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून केली जाते आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पातील सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट हा मार्ग चीन, अग्नेय आशिया, दक्षिण आशिया, मध्य आशिया, रशिया आणि युरोपाला रस्त्यांच्या मार्गाने जोडला जाणार आहे.
चीनच्या बीआरआयमध्ये पनामा कालव्याचा मोठा सहभाग मानला जात होता. मात्र पनामाने या प्रकल्पातून माघार घेणे हे पनामाच्या परराष्ट्र धोरणातील मोठा बदल मानला जातो आहे. अलिकडेच अमेरिकेच्या युद्धनौकांना पनामा कालव्यातून निःशुल्क वाहतूक करू दिली जाणार असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाच्यावतीने केला गेला होता. मात्र पनामाच्या अध्यक्षांनी ट्रम्प प्रशासनाचा हा दावा फेटाळून लावला आहे.





