भारतीय डाळिंबांना अमेरिकेची बाजारपेठ खुली; सहा वर्षानंतर निर्यात पुन्हा सुरू

पुणे – तब्बल सहा वर्षानंतर अमेरिकेत भारतातून डाळिंब निर्यात करण्यात आली. सन 2017-2018 मध्ये डाळिंबात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी लादली होती. त्यामुळे येथील डाळिंब तेथे जात नव्हते. पण, आता या उत्पादनासाठी अमेरिकन बाजारपेठ खुली झाली आहे.
सन 2022 पासून अमेरिकेने ही आयात बंदी उठवली होती. मात्र, त्यासाठी त्यांनी काही नियम व अटी घातल्या. त्यामध्ये माइट वॉश, सोडियम हायपोक्लोराइट प्रक्रिया, वॉशिंग-ड्राइंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानकांनुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
त्यानुसार अपेडा (ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी), एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या प्रयत्नांनी अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. डाळिंबाचा कंटेनर 27 जुलै रोजी कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना झाला. एकूण 150 बॉक्समधून 450 किलो डाळिंब हवाईमार्गे पाठविण्यात आला आहे.
याप्रसंगी “अपेडा’चे चेअरमन अभिषेक देव (भा.प्र.से.), संचालक अपेडा तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत अपेडाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू यांनी या डाळिंबाचे कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, विकीरण सुविधा केंद्र प्रमुख सतिश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, डाळींब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
या डाळिंब निर्यातीनंतर भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल. ही बंदी उठवण्याबाबत “अपेडा’ व “एन.पी.पी.ओ.’ भारत सरकार यांनी संयुक्तपणे अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून प्रयत्न केले – विनिता सुधांशू, जनरल मॅनेजर, अपेडा





