हॅरिस यांच्यामुळे अमेरिकेचा मृत्यू होईल; ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन : कमला हॅरिस यांच्यामुळे अमेरिकेत गुन्हेगारी, अनागोंदी, गोंधळ आणि अमेरिकेचा मृत्यू होईल, अशा शब्दात रिपब्ललिकन पक्षाचे उमेदवार जोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता 100 दिवसांचाच अवधी शिल्लक राहिलेला असताना दोन्ही पक्षांच्या प्रमुख उमेदवारांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे.
बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेत निर्माण झालेली अनागोंदी आपणच दूर करू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था आणि व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.कमला हॅरिस यांनी डिस्ट्रीक्ट ऍटर्नी म्हणून सॅन फ्रान्सिस्कोचा नाश केला आहे. त्या मूळच्या मार्क्सवादी ऍटर्नी होत्या. देशाच्या अध्यक्ष झाल्या तर त्या देशाचाही नाश करतील, असे ट्रम्प म्हणाले.
हॅरिस इतक्या टोकाच्या आणि निर्लज्ज आहेत की त्यांनी बेकायदेशीर घुसखोर आणि कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद या शब्दांना निषिद्ध आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले होते, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. बायडेन-हॅरिस यांच्या प्रशासनाच्या काळात सुरू करण्यात आलेले अमेरिकचे एकल खुली सीमा धोरण अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पहिल्याच दिवशी रद्द केले जाईल. देशाच्या सर्व सीमा सील केल्या जातील आणि देशात होणारी घुसखोरी थांबवली जाईल, असेही ते म्हणाले.
बायडेन यांची माघार म्हणजे बंड
बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाने माघार घेण्यास भाग पाडले आहे. हे कृत्य म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाने केलेले बंड आहे. ज्या व्यक्तीने १४ दशलक्ष मते मिळवली, त्याच्याविरोधातले हे बंडच आहे. बायडेन यांना निवडणूक लढवायची होती. मात्र पक्षाला ते नको होते. हे तर अध्यक्षांविरोधातले बंडच आहे. कारण बायडेन यांना राज्यघटनेतील 25 व्या घटनादुरुस्तीची धमकी देण्यात आली होती, असे ट्रम्प म्हणाले. अध्यक्ष मानसिक आणि शारीरिक सक्षम नसल्यास त्यांना बदलले जाऊ शकते, असे या घटनादुरुस्तीत म्हटले गेले आहे.





