‘तुम्हाला देशाबाहेर काढले जाऊ शकते…’, अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा, ट्रम्प यांचा नवा आदेश काय?

नवी दिल्ली/वॉशिंग्टन: भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जाणवणारी कटुता आता व्हिसा नियमांच्या कडक अंमलबजावणीतून समोर येत आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासानं बुधवारी (७ जानेवारी २०२६) भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशनबाबत अत्यंत कडक शब्दांत ताकीद जारी केली आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास थेट विद्यार्थी व्हिसा रद्द करून देशाबाहेर काढले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
‘व्हिसा ही सवलत आहे, अधिकार नाही’
अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत स्पष्ट केले की, “अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम तुमच्या विद्यार्थी व्हिसावर होतील. जर तुम्हाला अटक झाली किंवा तुम्ही कोणताही कायदा मोडला, तर तुमचा व्हिसा त्वरित रद्द केला जाऊ शकतो. एवढेच नाही, तर तुमची देशातून हकालपट्टी केली जाईल आणि भविष्यात तुम्ही अमेरिकन व्हिसासाठी कायमचे अपात्र ठरू शकता.”
दूतावासाने पुढे म्हटले आहे की, “नियमांचे पालन करा आणि तुमचा प्रवास धोक्यात घालू नका. हे लक्षात ठेवा की, अमेरिकन व्हिसा मिळणे ही एक सुविधा किंवा सवलत आहे, तो तुमचा अधिकार नाही.”
Breaking U.S. laws can have serious consequences for your student visa. If you are arrested or violate any laws, your visa may be revoked, you may be deported, and you could be ineligible for future U.S. visas. Follow the rules and don’t jeopardize your travel. A U.S. visa is a… pic.twitter.com/A3qyoo6fuD
— U.S. Embassy India (@USAndIndia) January 7, 2026
अवैध स्थलांतरितांच्या विरोधातही कडक पावले
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने सत्तेत आल्यापासून इमिग्रेशन नियमांबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या अवैध स्थलांतरितांनाही इशारा दिला होता. “इमिग्रेशन कायदा मोडल्यास मोठ्या फौजदारी शिक्षेला सामोरे जावे लागेल,” असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्या विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याची मोहीम सध्या अमेरिकेत वेगाने सुरू आहे.
व्हिसा नियम कडक झाल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
ट्रम्प प्रशासनाकडून H-1B आणि विद्यार्थी व्हिसा (F-1) नियम अधिक कडक केले जात आहेत. यामुळे अमेरिकेला पसंती देणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षात आंतरराष्ट्रीय प्रवेशांमध्ये १७ टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्ट २०२४ च्या आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांच्या आगमनात वार्षिक १९ टक्क्यांची घसरण झाली असून, २०२१ नंतरचा हा सर्वात नीचांकी स्तर आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील बदलत्या समीकरणांमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून, व्हिसा प्रक्रियेतील ही कठोरता येणाऱ्या काळात अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





