जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गरोदर महिलेला नेत असताना एम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. धरणगाव इथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही एम्ब्युलन्स निघाली होती. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काय घडले नेमके? धरणगावमधून गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना गाडीत आगीची ठिणगी उडाली. तेव्हा चालक राहुल बाविस्कर याला शंका आल्यानं त्यानं गाडी बाजूला घेतली आणि रुग्ण महिलेसह सर्वांना खाली उतरवलं. रुग्णांना दुसऱ्या एम्बुलन्समधून पुढे पाठवण्यात आलं. दरम्यान, थोड्या वेळातच एम्बुलन्सचा स्फोट झाला. एम्बुलन्सचा स्फोट इतका भीषण होता की वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. आगीचे लोट हवेत पसरले. तर पार्टस उडून बाजूला पडले होते. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर काही काळ महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. ऍम्ब्युलन्सच्या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली.