पुणे | इंद्राणी बालन फाउंडेशनकडून रुग्णवाहिका भेट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सामाजिक क्षेत्रात काम करणार्या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशनकडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार मानण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. ट्रस्टकडून नुकतीच राजारामबापू पाटील संस्थेला एक रुग्णवाहिका देण्यात आली, तसेच राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीमार्फत अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात.
कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना मोठ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणखी एका ॲम्ब्युलन्सची गरज होती. त्यासाठी ट्रस्टने युवा उद्योजक बालन यांच्याकडे तशी मागणी केली. त्यांची गरज ओळखून आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहून बालन यांनी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिकेसाठी अर्थसाह्य केले. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने बालन यांचे आभार मानण्यात आले.
रुग्णाला वेळेत उपचार मिळाले तर तो निश्चितपणे बरा होऊ शकते. त्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यंत अत्यावश्यक आहे. आरोग्य सेवेत डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असून या कार्यामुळेच त्यांच्या मागणीवरून ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत होईल, असा विश्वास आहे.





