वारी काळासाठी दुचाकींची केली “ऍम्ब्युलन्स’ : 8 वर्षांपासून मोफत सेवा

प्रीतम पुरोहित/ज्ञानेश्वर फड
वारकऱ्यांच्या सेवेत दिवेघाटात पोलीस उभे होते. ज्ञानदेवांची पालखी सासवडकडे जात होती. माउलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी झुंबड उडाली होती. अशावेळी कितीतरी जणांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावर पाय दिले. त्यांच्या पायाच्या करंगळीजवळ फ्रॅक्चर झाले. अशावेळी तो पोलीस कळवळला, पण त्याने पादुकांचे रक्षण सुरूच ठेवले. ही पालखी तळावर पोहचेपर्यंत हटायचे नाही, असा चंग त्यांनी बांधला. पालखी सासवडला आली आणि खाकी वस्त्रातील त्या सेवेकऱ्याने स्वतःच्या पायाकडे पाहिले. पाय पूर्ण सुजला होता…पंजाचा सांधा निखळला होता. हा कर्मचारी आरोग्य केंद्रावर गेला.
तेथे डॉक्टरांनी प्लॅस्टरचा सल्ला दिला. ड्युटी सोडून तर जाता येईना. दुसरा दिवस उजाडला आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला बलजितसिंग यांची बाइक ऍम्ब्युलन्स आणि वैद्यकीय पथक दिसले. या पोलिसाने परिचारिकांना सुजलेला पाय दाखवला अन् परिचारिका अक्षरश: कळवळल्या.. ताबडतोब मलमपट्टी केली आणि तेथील आरटीओ अधिकाऱ्याला ही माहिती दिली. त्यांनी तातडीने बाइक ऍम्ब्युलन्स बोलवली. एक उत्साही सरदारजी बाइक चालवत भर गर्दीतून वाट काढत या सेवा देणाऱ्या खाकी वस्त्रातील वारकऱ्याला रुग्णालयात पोहोचवले, प्लॅस्टर करून घेतले. मनोभावे निस्वार्थी सेवा करणाऱ्यांची ही अनोखी आरोग्यवारी करणाऱ्यांना सर्वांना मनोमन धन्यवाद दिले…
चालताना अनेकदा पाय दुखणे, फोड येणे, पायात गोळे येणे, चक्कर-थकवा-अशक्तपणा येतो. अशा वेळी त्यांना तत्काळ प्रथमोउपचार मिळणे आवश्यक असते. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत मोठी “ऍम्ब्युलन्स’ जाऊ-येऊ शकणे कठीण असते. अशा वेळी दुचाकी रुग्णवाहिका कमी येते. हीच सेवा बलजीतसिंग देत आहेत. आज त्यांच्यासमवेत जवळपास 35 पेक्षा जास्त बाइक ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे. वारी मार्गावर या प्रथमोपचार सेवा पुरवितात. जास्तच काही गरज पडली तर ते जवळच्या रुग्णालयात दाखल करतात. तशी त्यांनी व्यवस्था केली आहे. बलजितसिंग यांच्या दुचाकीत प्रथमोपचार साहित्य, गरजेनुसारची औषधे, रक्तदाब तपासणी यंत्र, रुग्णालय-डॉक्टरांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असतात. गरजू व्यक्तीला उपचारांची गरज असल्यास त्यांना तातडीने या “बाइक ऍम्ब्युलन्स’द्वारे रुग्णालयात पोहचवले जाते. या कार्यासाठी अनेकांनी बलजितसिंग यांची प्रशंसा केली आहे.




