Ambegaon News : आंबेगाव तालुक्यात उभारणार बाबासाहेबांचे भव्य स्मारक आणि संविधान भवन ; माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

प्रभात वृत्तसेवा
डिंभे – आंबेगाव तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्मारक, संविधान भवन, सामाजिक न्यायाची वसतिगृहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा केंद्र उभारल्यानंतरच मला माझी राजकीय कारकीर्द पूर्ण केल्यासारखे वाटेल, असा विश्वास माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. घोडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या मेळाव्यात त्यांनी हे आश्वासन दिले. या मेळाव्यास सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गौतमराव खरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरी जनतेने घोडेगाव शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर वनमाला मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून पाहुण्यांचे स्वागत झाले. स्मारक समितीचे सचिव प्रकाश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी यावेळी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक तसेच संविधान भवनाची मागणी केली. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही अनेक वर्षांची ही मागणी वळसे पाटलांनी पूर्ण करावी, असा आग्रह धरला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वळसे पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसूत्रीनुसार समाजाने एकसंघ राहावे. “तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे,” असे खात्रीशीर आश्वासन त्यांनी दिले. पुढील काळात हे सर्व प्रकल्प उभारून तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम माझ्या हातून केले जाईल, तेव्हाच माझी राजकीय कारकीर्द पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण असून, अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची खात्री झाली आहे.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णु हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश थोरात, माजी सभापती प्रकाश घोलप, माजी सनदी अधिकारी प्रकाश वाघमारे, प्रकाश सोनवणे, गौतम रोकडे, रवी फाले, रमाकांत जाधव, खंडू थोरात, एकनाथ वाव्हळ, मनोज थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.





