Pune District : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याने आंबेगाव-जुन्नर विकासाला मोठा धक्का

मंचर : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय जाहीर होताच आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने विकासाला मोठा धक्का बसला असून पर्यटन आणि उद्योगक्षेत्रात नाराजीची भावना तयार झाली आहे.
गेल्या तीन दशकांपासून आंबेगाव-जुन्नर या भागातून रेल्वेमार्ग जाणार अशी आशा नागरिक, व्यावसायिक, शेतकरी आणि पर्यटन क्षेत्राला होती. तीन वेळा याच मार्गाचे सर्वेक्षण झाले, खेड-मंचर परिसरात भूसंपादनही करण्यात आले. काही शेतकर्यांना तर भूसंपादनाचा मोबदलादेखील मिळाला. त्यामुळे रेल्वे मार्ग निश्चित झाला असल्याचा विश्वास निर्माण झाला होता. मात्र आता रेल्वे मार्ग शिर्डीकडे वळवल्याने या दोन तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी खिळ बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आंबेगाव आणि जुन्नर परिसर पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी क्षेत्रही आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकरासारखे जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक स्थळ, अष्टविनायकांतील ओझर व लेण्याद्री, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ही ऐतिहासिक स्थळे रेल्वे मार्ग बदल्यामुळे रेल्वे रुळापासून दूर गेली आहेत. त्यामुळे पर्यटनाला मिळणारा वाव कमी झाला असून या निर्णयामुळे या भागातील आर्थिक प्रगती कोलमडणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रेल्वे मार्ग या भागातून गेल्यास उद्योगपती, पर्यटन क्षेत्र, शिक्षण संस्था, व्यापारी वर्ग आणि स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला असता. परंतु मार्ग बदलल्याने विकासाची गाडी अडथळ्यात अडकणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांना रोजगार, जोडधंदे, बाजारपेठ आणि सोयीसुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. रेल्वेमुळे या दोन तालुक्यांचा नकाशाच पालटेल, असा विश्वास नागरिकांना होता. आता हा प्रकल्प दूर गेल्याने विकासाचे दार बंद झाले अशी नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि योग्य पातळीवर पाठपुरावा न झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. अनेक वर्षांपासून आशा लावून बसलेल्या नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना वाढत आहे. रेल्वे प्रकल्पावर पुनर्विचार व्हावा, असा जोरदार आवाज उठू लागला आहे.
रेल्वे आंबेगाव-जुन्नर मार्गे गेली असती तर व्यवसायाला नवी दिशा मिळाली असती. मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि बाहेरून ग्राहक येण्यासाठी मोठी सोय झाली असती. हा निर्णय ऐकून तीव्र नाराजी वाटते.
-प्रवीण शिंदे, सचिव आंबेगाव तालुका व्यापारी असोशिएशन मंचर.
शिवनेरी, भीमाशंकर, ओझर येथे पर्यटन प्रचंड आहे. रेल्वेमुळे पर्यटकांचा ओघ वाढून हॉटेल उद्योग दुप्पट वाढला असता. आता मार्ग बदलल्याने विकास थांबणार अशी भीती आहे.-संदेश राजाराम बागल, हॉटेल व्यवसायिक मंचर
-धनंजय फलके, हॉटेल व्यवसायिक घोडेगावआमचा द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला याचा मोठा पुरवठा पुणे-नाशिक दरम्यान होतो. रेल्वेमुळे माल पोहोचवणे स्वस्त आणि जलद झाले असते. आता पुन्हा महागडे ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहावे लागेल.
-संजय पवळे, सरपंच पेठ.
रेल्वे आल्यास इथल्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड चालना मिळाली असती. स्थानिक चालक, मार्गदर्शक, दुकानदार सर्वांनाच फायदा झाला असता. आता मार्ग सरळ शिर्डीकडे गेल्याने आमचे नुकसान झाले आहे.
-सदानंद मोरडे. अध्यक्ष भूमि अभिलेख संघटना पुणे जिल्हा





