Ambegaon Flood Alert : डिंभे धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू ; नदीकाठच्या गावांमध्ये धोक्याची घंटा

प्रभात वृत्तसेवा
घोडेगाव – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात मुसळधार पावसामुळे घोडनदीला पूर आल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील २५ बंधारे पाण्याखाली रविवार, दि.२८ रोजी सकाळी बुडाले.हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय गोहे खोऱ्यातील पावसाचे पाणीही थेट घोडनदीत मिसळत असल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रचंड ओघ निर्माण झाला आहे.
त्यामुळे घोडनदीवरील सुमारे २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, नदीपात्र ओलांडणे किंवा बंधाऱ्याजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही शेतजमिनींमध्येही पाणी साचले असून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून पाण्याची आवक व निचरा यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण व गोहे खोऱ्यातील पावसामुळे घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. सुरक्षिततेसाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावांनी दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.”
– दत्ता कोकणे, उपविभागीय अधिकारी, कुकडी प्रकल्प.

