Ambani and ED : टीना अंबानी यांचीही ईडीने केली चौकशी; काय आहे प्रकरण?

मुंबई :- रिलायन्स एडीए ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांचीही मंगळवारी परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणात ईडीने चौकशी केली.
कालच या प्रकरणात अनिल अंबानी यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. या दोघांना पुन्हा या आठवड्याच्या अखेरीला चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता आहे.
अंबानी दाम्पत्याने विदेशात काही अघोषित मालमत्ता जमवली असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा संशय असून त्या अनुषंगाने त्यांची ही चौकशी केली जात आहे. न्युजर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रस येथील काही ऑफशोर कंपन्यांशी अनिल अंबानीचे कथित संबंध असल्याचा संशय असून तो विषय सध्या ईडीच्या रडारवर आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, आयकर विभागाने अनिल अंबानी यांना काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत दोन स्विस बॅंक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटींहून अधिक अघोषित निधीवर 420 कोटी रुपये कर चुकवल्याबद्दल नोटीस जारी केली होती.





