Waghapur News : पिसवे सबस्टेशनचा अनागोंदी कारभार; ऐन हंगामात पिके सुकल्याने आंबळे ग्रामस्थ आक्रमक!
ऐन हंगामाच्या तोंडावर शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ आली की शेतकऱ्यांच्या (Waghapur News) तळपायाची आग मस्तकात जाते, आणि याच संतापाचा स्फोट आता आंबळे गावामध्ये पाहायला मिळत आहे.

Waghapur News : ऐन हंगामाच्या तोंडावर शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ आली की शेतकऱ्यांच्या (Waghapur News) तळपायाची आग मस्तकात जाते, आणि याच संतापाचा स्फोट आता आंबळे गावामध्ये पाहायला मिळत आहे.
पिसवे येथील वीज उपकेंद्रातून (सबस्टेशन) होणाऱ्या लहरी आणि बेभरवशाच्या वीजपुरवठ्याने (Waghapur News) संपूर्ण गावाला अक्षरशः वेठीस धरले असून, या अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी अखेर महावितरणच्या दारात धडक दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आंबळे परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक वीज गुल होणे, कमी-अधिक दाबाने वीज येणे या प्रकारांमुळे शेतीपंपांसह घरातील महागडी विद्युत उपकरणे जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत. आधीच अस्मानी संकटांशी सामना करणाऱ्या बळीराजाला आता महावितरणच्या सुलतानी कारभारामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात आंबळे ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे सासवड येथील कार्यकारी (Waghapur News) अभियंता यांना थेट निवेदन सोपवण्यात आले. पिसवे सबस्टेशनचे कामकाज नेमके कशा पद्धतीने चालते, वारंवार वीज खंडित होण्यामागे नेमके काय कारण आहे, असा थेट जाब ग्रामस्थांनी विचारला आहे.
सबस्टेशन बंद राहणार असल्यास अथवा वीजपुरवठ्यात काही फेरबदल होणार असल्यास त्याची पूर्वकल्पना ग्रामस्थांना वेळेत दिलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
अंधारात चाचपडणाऱ्या या परिसराला दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न उपस्थित करत महावितरणने या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.






