‘औरंगजेबने किती मंदिरं बांधली याची यादी द्यावी, आम्ही पण…’ अबू आझमींच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंनी दिले खुले आव्हान

Ambadas Danve | समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. औरंगजेबने अनेक मंदिरे बांधली होती, असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. औरंगजेबने किती मंदिरं बांधली याची यादी अबू आझमींनी द्यावी, असे म्हणत दानवे यांनी निशाणा साधला आहे.
अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक करत त्याने मंदिरं बांधली होती असा दावा केला होता. ‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवली आहेत. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे.’, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर आता इतर राजकीय पक्षातील नेत्यांकडून आझमींवर सडकून टीका केली जात आहे.
आझमींच्या या वक्तव्यावर बोलताना दानवे म्हणाले की, ‘औरंगजेबाने किती मंदिरं बांधली? याची यादी अबू आझमी यांनी द्यावी, तसेच औरंगजेबाने किती मंदिरं तोडली याची यादी आम्ही तुम्हाला देतो’, असे आव्हान त्यांनी आझमींना दिले.
दरम्यान, आझमींच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निशाणा साधला. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अतिशय दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. औरंगजेबाचे कौतूक म्हणजे महापाप आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.





