Ambadas Danve : एक देश, एक निवडणूकमुळे हुकूमशाहीचा धोका; अंबादास दानवे यांची टीका

मुंबई : एकाचवेळी संपूर्ण देशात निवडणुका घेण्याच्या केंद्र सरकारच्या वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या धोरणामुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. एकत्रित निवडणुका घेतल्यास स्थानिक मुद्द्यांचा आवाज राष्ट्रीय प्रचारात हरवण्याची शक्यता आहे. असेही अंबादास दानवे म्हणाले.
याबाबत त्यांनी एक राष्ट्र, एक निवडणूक संयुक्त समितीकडे त्यांनी हरकती नोंदवत काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत. वन नेशन, वन इलेक्शनचा एवढा पुळका आहे, तर मागच्या काळात हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुका झाल्या, तेव्हा महाराष्ट्राच्याही निवडणुका होऊ शकत होत्या. परंतु केंद्राच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड-हरियाणाच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या होत्या, असे दानवे म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मतदान केंद्रावर प्राथमिक सुविधांचा अभाव होता. बुथचे व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकले नाही. रात्री 2 वाजेपर्यंत मतदान चालल्याचे निवडणूक आयोग म्हणते. सायंकाळी पाच वाजेनंतर सुद्धा लाखो मतदान झाले, याचा अर्थ निवणूक यंत्रणा सुस्थितीत नव्हती, असे दानवे यांनी सांगितले.





