पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळेमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाची दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
या चिमुकल्याने घातलेला गणवेश पाहता महाराष्ट्रातील त्रांगड्या सरकारची दशा दिसून येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पँटला, ही काही विद्यार्थ्यांची चेष्टा सुरू आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत जात प्रयोग करत असतो मात्र, येथे विद्यार्थ्यांचीच प्रयोगशाळा करून ठेवली, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट 2024 पर्यंत गणवेश वाटले जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. त्यामुळे विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर आधीच टीका केली जात होती. आता जे गणवेश वाटण्यात आले आहेत. त्यांच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता या संदर्भात राज्य सरकार काय स्पष्टीकरण देणार? हे पहावे लागेल. आमदार रोहित पवार यांनी देखील या आधी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या संदर्भात त्यांनी विधानसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता.





