‘भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांचा बटीक, त्यांचाच घरचा सालदार, गडी’

गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळू नये, म्हणून काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदान करु शकत नाहीत, पत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलतांना यावरून निवडणुक आयोगावर टीका केली आहे,
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे ?
हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचं म्हटलं. सत्ता कुठंपर्यंत पोहोचते, न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे दिसून येतं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारताना सगळ्या जगानं बघितलं आहे. अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिलं नव्हतं. गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोग पक्षपाती आहे का? हा प्रश्न निर्माण होणार आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांचा बटीक, त्यांचाच घरचा सालदार, गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होईल, अस म्हणत दानवे यांनी खोचक टीका केली आहे.





