#व्हिडीओ: अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुतर्फा उभे असलेले भाविक, उत्सवमूर्तीवर होणारा फुलांचा वर्षाव अशा प्रसन्न वातावरणात अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला.
वर्षातून एकदा नगरवासीयांची भेट घेण्यास निघणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ‘अंबा माता की जय’ आशा अंबा मातेच्या जयघोषाने प्रफुल्लित परिसर, रांगोळीचे गालीचे, फुलांच्या पायघड्या, पारंपरिक वाद्यवृंद, भालदार, चोपदार, रोषणाई असा शाही लवाजमा घेऊन फुलांनी सजवलेल्या चांदीच्या वाहनातून करवीर निवासिनी अंबाबाई शहरवासीयांच्या भेटीला मंदिराबाहेर पडली. संपूर्ण मार्ग जगदंबेच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुलांनी सजवला होता.
फुलांनी सजविलेल्या वाहनात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन झाले. या वेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते. तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून वाहन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले.
महाद्वारातून निघालेल्या देवीच्या वाहनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. देवीच्या स्वागतासाठी मार्गावर दुतर्फा भाविक उभे होते. परंपरेनुसार पोलिस बँडची सलामी झाल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचे वाहन निघाले. नेत्रदीपक आतीषबाजीने परिसर उजळून गेला होता.





