अॅमेझॉन भारतातून 80 अब्ज डॉलरची निर्यात करणार

नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतातून निर्यात वाढवीत आहे. 2030 पर्यंत ही कंपनी भारतातून 80 अब्ज डॉलरची निर्यात वर्षाला करेल. सध्या ही कंपनी वर्षाला 20 अब्ज डॉलरची निर्यात करते.
अमेझॉनच्या संभव शिखर परिषदेत ही माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी दिली. ते म्हणाले की, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही सरकार आणि छोट्या उद्योगांबरोबर सहकार्य वाढविले आहे. सध्या या व्यासपीठावरून दीड लाख विक्रेते विक्री करतात. आम्ही भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे अॅमेझॉन इंडियाचे भारतातील व्यवस्थापक समीर कुमार यांनी सांगितले.
दरम्यान दैनंदिन उपयोगी किराणा पुरवठा क्षेत्रात अॅमेझॉन कंपनी उतरणार आहे. यासाठी बंगळुरूमध्ये तयारी पूर्ण झाली असून या उपक्रमांतर्गत ग्राहकांना पंधरा मिनिटात किराणा सामान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या क्षेत्रात झेप्टो आणि ब्लिंकीट या कंपन्या यशस्वी झाल्या असून इतरही कंपन्या नशीब आजमावत असल्याचे दिसून येते.
देशातील सर्व जिल्ह्यात ही सेवा सुरू करण्यासाठी तयारी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या क्विक कॉमर्स बाजारपेठ 6.1 अब्ज डॉलरच्या असून ती 2030 पर्यंत 40 अब्ज डॉलरची होण्याची शक्यता आहे या संधीचा फायदा अॅमेझॉन कंपनी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.





