पिंपरी | पद्मश्री पेटकर यांचा जीवनप्रवास थक्क करणारा – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी, (प्रतिनिधी) – दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर देशभक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या पॅराऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.
अनंत अडचणींवर मात करत यशस्वीतेकडे उत्तुंग भरारी घेणारा हा बहुआयामी प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा आणि दिशा देणारा आहे. ते या शहराचे नागरिक आहेत याचा सार्थ अभिमान शहरवासीयांना आहे, असे उद्गार आयुक्त शेखर सिंह यांनी काढले.
महापालिकेत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी महापौर मंगला कदम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. त्यांचे हे कर्तृत्व, विविध खेळांमधील यशस्वी कामगिरी, देशप्रेम आणि संघर्षमयी जीवनप्रवास रेखाटणारा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या माध्यमातून पद्मश्री पेटकर यांच्या आयुष्याची कहाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चंदू चॅम्पियन हा चित्रपट पालिकेच्या क्रीडाप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसह पालिका शाळेतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे.
खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे – पेटकर
श्रीनिवास पाटील महापालिका आयुक्त असताना महापालिकेने माझा सन्मान केला असल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली. टेल्को कंपनी कॅन्टीन सुपरवायझर आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी जेआरडी टाटा यांनी दिली. त्यामुळे शहरात स्थायिक झालो.
या शहराचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो. मुलांनी आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करावे. खेळाडूंनी कर्तृत्व सिद्ध करत देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा मुलमंत्री पेटकर यांनी दिला, असे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी अनुभव कथन करताना सांगितले.





