शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अमरिंदर यांचे मोदींना आवाहन

चंडीगढ – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलकांबरोबरची चर्चा प्रक्रिया पुन्हा तातडीने सुरू करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, पाकिस्तानी कारवायांचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही अमरिंदर यांनी दिला आहे.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी जवळपास आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्यामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाने पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे.
अशातच त्या राज्यातील निवडणूक तोंडावर आली आहे. त्याचा संदर्भ घेऊन अमरिंदर यांनी मोदींना पत्र पाठवले आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमधील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. तसेच, आर्थिक व्यवहारांवर परिणात होत आहे.
सध्याच्या स्थितीचा गैरफायदा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा पाठिंबा असणाऱ्या दहशतवादी संघटना घेऊ शकतात. खलिस्तानवादी संघटना शेतकरी नेत्यांना लक्ष्य करून हल्ले घडवू शकतात अशी माहिती असल्याचे अमरिंदर यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पंजाबमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मोदींना भेटण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.


