अमनोरा पार्कचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडेंवर छापेमारी

पुणे – पुण्यामध्ये आज आयकर विभागाकडून(आयटी) एकूण आठ जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांचा देखील समावेश आहे. पुण्यातील नावाजलेले उद्योजक सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे प्रमुख देशपांडे यांच्या कार्यालय तसेच घरावर आयटीकडून ही छापेमारी करण्यात आली.
याशिवाय आयकर विभागाने आणखी सहा ते सात जागांवर छापेमारी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या संशयातून आयकर विभागाकडून ही तपासणी करण्यात आली आहे. यावेळी देशपांडे यांच्या घर, कार्यालयासह इतर ठिकाणांची देखील तपासणी करण्यात आली. पहाटेपासूनच आयकर विभागाकडून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, ही कारवाई सुरु होताच पुण्यातील उद्योग जगतात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. पवार यांच्यासह देशपांडे यांचे इतर मोठ्या राजकीय नेत्यांसोबत देखील जवळचे संबंध असल्याने याबाबत आणखी चर्चांना उधान आले आहे.





