Pune District | दोन दशकानंतर माजी विद्यार्थी एकत्र

बारामती : दोन तपानंतर जुन्या मित्र मैत्रीणींना भेटण्याचा आनंद येथील छत्रपती शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला. एकमेकांसोबत व्यतित केलेले क्षण व शालेय आठवणींना उजाळा देत मित्र- मैत्रीणींचा स्नेहमेळावा बहारदार झाला.
शाहू हायस्कूलच्या 2001-2002 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. जुन्या मैत्रीला पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी उपक्रमाचे माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचा प्रारंभ झाला. याप्रसंगी सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्लास वन अधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस अशा विविध पदांवर कार्यरत माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
शालेय जीवनात ज्या गुरुवर्यांनी अध्यापन केले, असे शिक्षक पाहून व त्यांच्यासोबत काही काळ व्यतित करता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्राचार्य गणपत तावरे, परिघा मोरे, निर्मला नायकुडे, आशाताई कुलकर्णी, संजीवनी शिरकांडे, प्रभावती पवार, सुरेश दुधाने, दादासाहेब शिरकांडे, नजीर मोमीन, नंदकुमार आमने, जयवंत मांडके, काशिनाथ जाधव, बापू जरांडे, मच्छिंद्र शिंदे, भास्कर जगताप, कुंडलिक पवार, सुवर्णा जगदाळे या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ॲड. वैभव काळे, सागर हिंगमिरे, आदेश सोळसकर, विद्या शेलार, संध्या किर्दक, पूनम गवळी, परविन इनामदार यांच्या प्रयत्नातून हा स्नेहमेळावा पार पडला. आदेश सोळसकर यांनी शाळेच्या सीसीटीव्हीसाठी लागणारी हार्ड डिस्क स्वखर्चाने भेट दिली. ॲड. वैभव काळे यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वच विद्यार्थ्यांनी कौतुक केले.





