समाज घडविणाऱ्या ‘सुपर वुमन’चाही सन्मान

आपल्या कार्यातून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तीला नमन
पुणे – पुण्याच्या सार्वजनिक क्षेत्रात अग्रभागी असणाऱ्या दैनिक “प्रभात’ची शतकी वाटचाल सुरू आहे. सामाजिक कार्यात सतत सहभागी होत विविध उपक्रमांच्या माध्यमातून “प्रभात’च्या वतीने समाजोपयोगी कामे सुरू आहेत. पुरस्काराचे यंदा प्रथम वर्ष होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या कार्यातून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांना “प्रभात’ परिवाराच्या वतीने गौरवण्यात आले.
शुभांगीताई तरस
शेतकऱ्याची लेक असूनही उच्च स्वप्न बघत ते गाठण्यासाठी धडपडणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे येथील एंजल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शुभांगीताई तरस यांची शिक्षण क्षेत्रातील धडपड वाखाणण्याजोगी आहे.
जयश्रीताई सातव-पाटील
हवेली तालुक्यातील व पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली गावात विकासाची कवाडं खऱ्या अर्थाने जयश्रीताई सातव यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात खुले झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चाकोरीबाहेर जात गावाचा विकास घडवून आणण्यात मोठा वाटा उचलला.
डॉ. प्रेरणाताई मुळूक-पवार
या मूळच्या खेड तालुक्यातील. त्या पशुसंवर्धन अधिकारी असल्याने सध्या अहमदनगर जिल्ह्यात आपले कार्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना “मुक्या जीवांची माउली’ नावाने संबोधले जाते.
सुजाताताई चोरडिया
कितीही मोठे संकट आले, तरी त्याला धैर्याने कसे सामोरे जावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील सुजाताताई चोरडिया. संपूर्ण कुटुंबाला प्रेमाच्या, विश्वासाच्या धाग्यानेही त्यांनी एकत्र बांधून ठेवले आहे.
निताताई परदेशी
वुमन्स हेल्पलाइनच्या माध्यमातून शेकडोंच्या संसारांचा “आधार’ म्हणून निताताई परदेशी यांचे नाव आदराने घेतले जाते. महिलांच्या सर्व समस्या सोडवून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या निताताई परदेशी यांच्या कर्तृत्वाला सलाम.
ज्योतीताई मासाळ
समाजातल्या अस्वस्थेतेवर बोट ठेवून माणुसकीची ज्योत सदा तेवत राहिल यासाठी मानवता फाउंडेशनच्या माध्यमातून झटणाऱ्या बारामतीच्या ज्योती मासाळ यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सौ. सुमिताताई सातारकर
पुण्यात ऍक्युपंक्चरद्वारे लोकांच्या वेदनांवर फुंकर घालण्याच्या तंत्रशुद्ध पद्धतीमुळे त्यांची ख्याती आहे. याचबरोबर त्यांच्यात एक उत्कृष्ट गायिकादेखील लपलेली आहे. “तंत्रशुद्ध उपचार’ आणि “मंत्रमुग्ध करणारे गायन’ हीच त्यांची ओळख
दुर्गाताई भोर
केवळ एकाच क्षेत्रात नाही, तर अनेक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या दुर्गाताई भोर यांना खरंच “दुर्गे’चा अवतार म्हणावे लागेल. पिंपरी-चिंचवड येथील दुर्गाताई भोर या उद्योजिका, मेकॅनिक, समाजसेविका, पर्यावरणवादी आदी बिरुदही कमी पडेल असे हे व्यक्तिमत्त्व.
सौ. सारिकाताई पवार
“तेजस्विनी सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे देणाऱ्या हवेली तालुक्यातील वाघोली येथील सारिकाताई पवार. गरजू, पीडित, गरीब महिलांसाठी खऱ्या अर्थाने त्या “तेजस्विनी’ ठरल्या आहेत.
तृप्तीताई हवालदार
पुण्यातील आकृती आर्किटेक्ट्स ऍन्ड डिझाइन्सच्या संचालिका तृप्ती हवालदार या एखाद्याच्या स्वप्नातील सुंदर घर उभारण्यात एक्सपर्ट मानल्या जातात. पतीच्या पाठबळावर अवघ्या 15 वर्षांत व्यवसायात मोठा टप्पा गाठला आहे.
शशिकलाताई ओव्हाळ
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा उद्योजक शेखर ओव्हाळ यांच्या मातोश्री म्हणून शशिकलाताई ओव्हाळ यांची एवढीच ओळख नसून घर बांधण्यासाठी विटा बनवणारी माऊली अशी शशिकलाताई ओव्हाळ यांची ओळख.
सौ. नलिनीताई लोळे
पुरंदर तालुक्यातील पानवडी गावातील सौ. नलिनी लोळे यांनी सरपंचपदावर काम करीत असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या गावाला पाणीदार केले. त्या सध्या पुरंदर पंचायत समितीच्या सभापतिपदावरून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहेत.
अंकिताताई शहा
“स्वच्छ इंदापूर तर सुदृढ इंदापूरकर’ यासाठी इंदापूर शहर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे स्वच्छतेतील नावीन्यपूर्ण उपक्रम हे कौतुकास्पद आहेत.
प्रतीक्षाताई घुले
प्रतीक्षा घुले एक अगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून नावाजलेले नाव. उदारत्व, सक्रिय, गंभीर आणि चांगल्या कार्यासाठी सदैव तत्पर असलेल्या प्रतीक्षाताई घुले अशी त्यांची वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण झाली आहे.
कविताताई बहल
खेळाडू, डॉक्टर होता आले नसले तरी क्रीडा, आरोग्य क्षेत्रासाठी व पर्यावरण क्षेत्रासाठी कविता बहल “स्व. ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट्र’च्या माध्यमातून करीत असलेले कार्य वाखाण्याजोगे आहे.
दीपालीताई शेळके
शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या खेडेगावातील असल्या तरी गावातील महिलांच्या प्रश्नांसाठी आणि महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून दिवस-रात्र त्या झटत आहेत.
सौ. रत्नाताई पिंगळे
पत्नी, सून, आई, मैत्रिण अशी विविध नाती जपत “राजमाता जिजाऊ महिला संस्थे’च्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या खेड तालुक्यातील भामचंद्रनगर येथील सौ. रत्नाताई पिंगळे यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सौ. ज्योतीताई आरगडे
खेड तालुक्यातील काळूस गावातील यशस्वी गृहिणी ते खेड पंचायत समितीच्या प्रथम महिला उपसभापतीपद भूषवणाऱ्या सौ. ज्योतीताई आरगडे या समाजकारणातही अग्रेसर आहे. ज्योतीताई यांनी घरकाम, शेती, करीत समाजकारणाचा घेतलेला वसा निर्विवादपणे पुढे नेत आहे. तर बाजार समितीच्या त्या संचालिका आहेत.
सुनीताताई धुमाळ
हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी गावच्या सरपंच सौ. सुनीताताई धुमाळ. त्या हाडाच्या समाजकारणी असून बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांच्या आधारवड ठरल्या असून त्यांचे कार्य अहोरात्र सुरुच आहे.
रामेश्वरीताई जाधव
उच्चशिक्षण घेऊनदेखील समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याची तळमळ. मूक-बधिर विद्यार्थ्यांना पंख देण्यासाठी बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे निवासी शाळेद्वारे त्यांच्या आयुष्याला आकार देत आहेत.
केतकीताई गावडे
या मूळच्या दौंडच्या असल्या, तरी त्यांची कर्मभूमी वारजे (पुणे) येथील. जिद्दीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख “आयएसओ’च्या माध्यमातून देश-विदेशात आहे. बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तर त्यावर मात कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे केतकीताईंकडे पहावे लागेल.
स्वातीताई आंब्रे
खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथे “द्वारका’ स्कूलची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या माध्यमातून विविध प्रायोगिक उपक्रमांची पायाभरणी करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत.
तरन्नुमताई सय्यद
बारामती नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान असलेल्या तरन्नुम सय्यद उच्चशिक्षित असून राजकारणापेक्षा त्यांना समाजकारणच अधिक प्रिय आहे. बारामतीच्या विकासासाठी त्या झटत आहेत.
पौर्णिमाताई सोनावणे
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी झटणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका पौर्णिमाताई सोनावणे. महिलांना पाठबळ देणारे व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांची ओळख आहे.
जेनेटताई माने
कासारवाडी येथे इन्फंट जिस्स प्रा. स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यात पर्दापण केले. तर शाळेतील अध्यापक सर्व महिला असून महिलांना बरोबर घेऊन शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे अविरत कार्य करीत आहेत.
रंजनाताई भोसले
सुरुवातीला हातगाड्यावर हॉटेल चालवत उदरनिर्वाह करीत मोठ्या कष्टाने मुलांना घडवून पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरिमधील दोन उद्योजकांची माता म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने ख्याती मिळवली आहे.





