Allu Arjun: संतप्त जमावाकडून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड, 8 जणांना अटक

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या समोरील समस्या काही थांबायच्या नाव घेईना. हैदराबाद थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणातून त्याची सुटका होत नाही, तोच एका टोळीने त्याच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची नासधूस केली आहे. हे लोक उस्मानिया विद्यापीठाचे सदस्य असल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून ८ जणांना ताब्यात घेतले आहे.
का केली तोडफोड?
उस्मानिया युनिव्हर्सिटी जेएसीच्या अनेक सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली. यामुळे ही तोडफोड करण्यात आली.
काय घडले होते नेमके?
‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती असताना एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती.





