Allu Arjun Birthday Special: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे देशभरात लोकप्रिय झालेल्या अल्लू अर्जुनला आज ‘पुष्पा राज’ म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या अभिनयाने, स्टाइलने आणि डान्समुळे त्यांनी कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अल्लू अर्जुन यांनी खूप लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ते अवघे तीन वर्षांचे असताना १९८५ साली आलेल्या ‘विजेता’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांनी ‘स्वाती मुथ्यम’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. मात्र मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास २००३ साली ‘गंगोत्री’ या चित्रपटातून सुरू झाला. त्यांना खरी ओळख २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘आर्या’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटामुळे ते एका रात्रीत स्टार झाले आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. Allu Arjun अनेकांना माहीत नसलेली एक खास गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुन यांना सुरुवातीला अभिनेता व्हायचं नव्हतं. त्यांच्या मनात वेगवेगळी स्वप्नं होती. कधी ते पियानो शिक्षक बनण्याचा विचार करत, तर कधी मार्शल आर्ट्समध्ये करिअर करायचं स्वप्न पाहत. विशेष म्हणजे, एक काळ असा होता की त्यांना नासा मध्ये काम करण्याचंही स्वप्न होतं. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी अॅनिमेशनचं शिक्षण घेतलं आणि काही काळ व्हिज्युअल इफेक्ट्सशी संबंधित कामही केलं. पण शेवटी त्यांनी अभिनयाची वाट निवडली आणि त्याच निर्णयामुळे ते आज इतके मोठे स्टार बनले आहेत. अल्लू अर्जुन केवळ अभिनेता नाहीत, तर ते सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. ते दरवर्षी आपल्या वाढदिवशी रक्तदान करतात आणि आपल्या चाहत्यांनाही या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करतात. त्यामुळे त्यांची एक वेगळी आणि प्रेरणादायी प्रतिमा तयार झाली आहे. ते उत्तम डान्सर तर आहेतच, पण त्यांना गाण्याचीही आवड आहे. ‘सर्रेनोडु’ या चित्रपटासाठी त्यांनी एक गाणंही गायलं आहे, जे प्रेक्षकांना खूप आवडलं. कामाच्या बाबतीत पाहिलं तर अल्लू अर्जुन यांचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘एए२२xए६’ या चित्रपटात ते दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत काम करत आहेत, ज्यामध्ये दीपिका पादुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ते लोकेश कनगराज यांच्यासोबत ‘एए२३’ या चित्रपटातही दिसणार आहेत. तसेच ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ या चित्रपटाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. नासा मध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणारा हा मुलगा आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनला आहे, हीच त्यांची खरी प्रेरणादायी कहाणी आहे.