Allu Arjun Bail: अभिनेता अल्लू अर्जुनचा तुरूंगवास टळला, अंतरिम जामीन मंजूर; आतापर्यंत काय-काय घडले, जाणून घ्या

नवी दिल्ली – तेलगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आणि चित्रपट ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर काही वेळाने अभिनेत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगवास टळला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मजूर केला आहे.
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या –
4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. स्क्रिनिंगवेळी अल्लू अर्जुन घटनास्थळी उपस्थित होता.
स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरी –
4 डिसेंबर रोजी संध्याकाळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अल्लू अर्जुनचे चाहते स्क्रिनिंगसाठी मोठ्या संख्येने थिएटरमध्ये पोहोचले होते. चित्रपटगृहाबाहेरचा जमाव एवढा अनियंत्रित झाला की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या गर्दीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
ही महिला आपल्या कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचेही त्याने सांगितले.
मृत महिलेच्या कुटुंबीयांची तक्रार –
मात्र, याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे, अभिनेता अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 105 दोषी हत्याकांडाशी संबंधित आहे. त्याच वेळी, अभिनेत्यावर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि कलम 105 अंतर्गत निष्काळजीपणाचा आरोप आहे.
शुक्रवारी पोलीस पुष्पाच्या घरी पोहोचले –
आज सकाळी हैदराबाद पोलीस अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले आणि त्याला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेत्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यानंतर अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त संध्या थिएटरचे व्यवस्थापन आणि कर्मचारी तसेच अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाचेही नाव त्यात आहे.
त्यानंतर दुपारपर्यंत ‘पुष्पा 2’ स्टारला अटक झाल्याची माहिती समोर आली. यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद आणि त्याचा भाऊही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
अल्लू अर्जुनच्या वकिलाने कोर्टाला विनंती केली आहे की या केसमध्ये आपत्कालीन सुनावणी घ्यावी आणि त्याला सोमवारपर्यंत अटकेपासून दिलासा द्यावा.
दरम्यान, मयत महिलेचा पती भास्कर यांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली. भास्करने स्पष्ट केले की, त्यांच्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आपण अभिनेत्याला जबाबदार धरत नाही. त्यानंतर आता सायंकाळी अल्लू अर्जुनला जामीन मिळाला असून त्याचा तुरुंगवास टळला आहे.





