पिंपरी | लघुद्योगांना वीजबील सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत द्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – आर्थिक अडचणीचा सामना करतानदेखील लघुद्योगांकडून वीजबील भरण्याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र कामगारांना दिवाळीचा बोनस व अन्य कारणांमुळे वीजबील वेळेत न भरणार्या लघुद्योगांचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे.
त्याऐवजी या लघुद्यगांना हे वीजबील सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सवकलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरात तसेच चाकण, तळेगाव, रांजणगाव या परिसरात एकूण 25 ते 30 हजार इंडस्ट्रीज आहेत. तर सध्या थकीत वीज बिलामुळे अनेक उद्योग बंद अवस्थेत आहेत.
पूर्वी उद्योगांना वीज बिलामध्ये सुलभ हप्त्यांची सवलत होती, परंतु सध्या शासनाने ती सवलत बंद केलेली आहे. त्यामुळे अनेक लघु उद्योगावर त्याचा मोठा गंभीर परिणाम होऊन उद्योग बंद अवस्थेमध्ये गेले आहेत.
दिवाळी काळात देखील कामगारांना बोनस आणि विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात खर्च कंपनीवर येत असतात. या काळात वीज बंद झाल्यास उद्योगांचे मोठे नुकसान होते.
लघुउद्योगांना मोठ्या कंपन्यांकडून दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत बिलाचे पेमेंट मिळत असते. त्यामुळे लघु उद्योगांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो. परिणामी खेळते भांडवल मिळण्यास अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा इच्छा नसूनही खासगी सावकाराकडून कर्ज उचलावे लागते.
वीज बिलामध्ये सुलभ हप्ते योजना मिळाल्यास लघु उद्योगांना वीज बिल वेळेमध्ये भरता येतील व उद्योग सुरळीत चालू राहतील. महावितरणकडुन वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे सुद्धा उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
कामगारांना बसून पगार द्यावा लागतो . वीज बिल भरण्यास दिरंगाई झाल्यास त्वरित वीज पुरवठा खंडित करण्यात येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वीज बिलात हप्त्याने भरण्याची सवलत दिल्यास उद्योजकाना ते सोपे जाईल.
या मागणीचा महावितरण कंपनीने गांभिर्याने विचार करावा, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा भोर यांनी दिला आहे.





