पुणे | बीबीए, बीसीएच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याची मुभा मिळावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सीईटी सेलमार्फत होत आहे. मात्र त्याची माहिती नसल्याने यंदा बीबीए, बीसीएच्या अनेक जागा रिक्त राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदा विशेष बाब म्हणून सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था अथवा महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने केली आहे.
याबाबतचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई पुणे विद्यापीठास दिले आहे. या निवेदनावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ. निवेदिता एकबोटे, प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, संजय खरात, उपप्राचार्य मिलिंद आळंदीकर यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.
दरवर्षी बीबीए,बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालयस्तर होत होती. यावर्षीपासून केंद्रीय पद्धतीने राज्य सीईटी सेलमार्फत प्रवेशप्रक्रिया होत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटीसाठी अर्जच केले नाहीत.
त्यामुळे अनेक विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. सद्यस्थितीत निम्म्यांहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारता घेता विशेष बाब म्हणून पुरवणी प्रवेश परीक्षेचे आयोजन करावी. अथवा, रिक्त राहिलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्याची मुभा देण्यात यावी. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी डाॅ. गजानन एकबोटे आणि प्रा. शामकांत देशमुख यांनी केली आहे.





